छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेला कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणार्या तत्कालीन महाराणा सेक्युरिटी एजन्सीला वेतन बिलांपोटी तब्बल १९.७६ कोटी रुपये जादा अदा झाल्याचे ऑडिटमध्ये उघड झाले होते. या रकमेच्या वसुलीसाठी प्रशासनाने वारंवार नोटिसा बजावूनही एजन्सीने प्रतिसाद दिला नाही. अखेर मनपा आयुक्तांनी एजन्सीच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू करताच एजन्सीने अतिप्रदानाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, जीएसटी, पीएफ आणि एचआरएपोटी ७.१२ कोटी रुपये वगळून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देण्याची मागणी एजन्सीने केली असल्याची माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
मनपाच्या स्थायी समितीची सभा नुकतीच पार पडली. या सभेत नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी मनपाच्या आतापर्यंत झालेल्या लेखा परिक्षणात मागील ४० वर्षापासून थकीत असलेल्या ५४३ कोटी रुपयांच्या रक्कम वसुलीबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा केली. सभापती अनिल मकरिये यांनी लेखा परिक्षणातील रक्कम वसूल करण्यासंदर्भात आदेशित केले. ही रक्कम वसूल करण्यासाठी विभागप्रमुखांनी पाठपुरावा करावा, मनपाचे नुकसान होता कामा नये, विभागप्रमुखांनी आठ दिवसांत ही रक्कम वसूल करावी, असे आदेश सभापती मकरिये यांनी दिले. या चर्चेदरम्यान महाराणा एजन्सीकडील वसुलीबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.
त्यांच्या मालमत्तांना २ टक्के शास्ती
आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, महाराणा सेक्युरिटी एजन्सीला अतिप्रदान झालेल्या रकमेबाबत चौकशीसाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने १९.७६ कोटी रुपये निश्चित केले आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी एजन्सीला वारंवार नोटीस बजावल्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने, एजन्सीधारकाव्या मालमत्तांवर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील मालमत्तांवरही बोजा वढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले आहे. तसेच शहरातील त्याच्या मालमत्तांना लावलेल्या मालमता करात या रकमेचा समावेश करून त्यावर २ टक्के शास्ती लावण्यात येईल.













